Satish Raut: A Poet

वर्षपूर्ती

वर्षपूर्ती

अजूनी आठवते ती संध्याकाळ ! २० ऑक्टोबर,२०२५ ची ऐन दिवाळीच्याआदला दिवस. सुमारे १७ वर्षे महसूल विभागापासून लांब राहून माझी स्वगृही पदोन्नतीवर परती होणार होती. मला सांगण्यात आलं होतं की, दूपारी ३ वाजेपर्यंत अपर जिल्हाधिकारी, पुणे या पदावरील माझ्या बदलीचा शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. त्या दिवशी कलेक्टर डिक्लेअर्ड शासकीय सुटी होती. असे असताना देखील वेळ न दवडता अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार मी घ्यावा असे जिल्हाधिकारी महोदयांची सूचना होती. मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपास ठिय्या मांडण्याचं ठरवलं. प्रवीण कांबळे व धनंजय गायकवाड या मित्रांना सोबतीला घेऊन पुणे कॅम्प रस्त्यावरील एस.जी.एस. मॉल मध्ये रेस्टॉरंट्स समोरील खुर्च्यांवर लॅपटॉप उघडून बदलीचा शासन निर्णय वेबसाईटवर अपलोडहोण्याची प्रतिक्षा करत बसलो.

एकेका अधिकाऱ्याच्या बदलीचा स्वतंत्र शासन निर्णय निघू लागला तशी आमची शीगेला पोहोचलेली उत्सुकता अस्वस्थतेमध्ये बदलत गेली. माझी नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवर खिळेना. मी प्रवीणवर हे काम सोपवले. त्याला म्हटले – “तू आता स्नाईपर (Sniper)हो; एकटक बघत रहा; निशाणा चूकला तर बघ !” त्याच्यावर काम सोपवून मी इकडे-तिकडे भटकू लागलो. संध्याकाळ उलटून गेली. रात्रीचे पाऊणे आठ वाजले तेव्हा कुठे माझ्या बदलीचा जी.आर. प्रवीणच्या नजरेच्या टप्प्यात आला ! ‘ नाव- सतीश ज्ञानदेव राऊत, पदस्थापनेचे ठिकाण- अपर जिल्हाधिकारी,पुणे’ हे वाचून माझ्या दोन्ही मित्रांनी विजयी अविर्भाव करत माझे अभिनंदन केले.

मी जिल्हाधिकारी महोदयांना फोन लावला. रात्रीचे जवळपास आठ वाजले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाला सुटीची कुलूपे लागली होती. त्यामुळे मला वाटले की, जिल्हाधिकारी महोदय मला ‘उद्या पदाचा कार्यभार घ्या !’असं म्हणतील. परंतू जिल्हाधिकारी महोदयांनी मला ‘ महसूल चिटणीसांचा फोन येईल’ असे सांगितले. फोन ठेवताच मला तहसीलदार कडनोर यांचा फोन आला. त्यांनी ‘पाच मिनिटांत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचतो, आपण या!’ अशी विनंती केली. मी काही मिनिटांत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलो. वॉचमनने दरवाजे उघडून मला पाचव्या मजल्यावर नेले. तेवढयात कडनोर देखील पोचले. त्यांनी मला अपर जिल्हाधिकारी, पुणे या कार्यालयात नेले. काही कागदपत्रांवर सह्या करून, ऑनलाईन पद्धतीने श्री. मापारी सर यांच्याकडून कार्यभार स्विकारण्याचे सोपस्कार पुर्ण झाले.

मी अपर जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसलो. तो एक माझ्यासाठी एक भावूक क्षण होता. माझ्या डोळ्यासमोर पुणे जिल्ह्यातील चऱ्होली हे आजोळ उभं राहिलं. अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या माझ्या विधवा आजीला जमीन व्यवहारात फसवलं गेलं त्यावेळी ‘आपण तहसीलदार व्हावं !’ असं आपसूक मनात आलं होतं. लहान वयात त्यापेक्षा मोठं पद माहित ही नव्हतं. आज समजलं स्वप्न देखील मोठी पाहावयास हवीत. ‘मुलगा जिल्हाचा अपर जिल्हाधिकारी झाला !’ याचा आई आणि दादा यांना किती अभिमान वाटला असता या विचारानं हृदय भरून आलं. यापूर्वी पदभार सांभाळलेल्या अधिकाऱ्यांच्या फलकाकडे लक्ष गेलं. १९५८ पासून बडी-बडी आय.ए.एस. मंडळी ह्या खुर्चीवर बसली होती. मात्र पुणे जिल्ह्यातला मी एकमेव असावा. त्यामुळे माझ्या मातीतील माणसांसाठी झोकून द्यायचा निर्धार केला.

सुमारे १७ वर्षे महसूल प्रशासनाशी थेट संपर्क तुटला होता. पण मनात आत्मविश्वास होता. एकदा सायकल चालवायला किंवा पोहायला शिकलं की विसरलं जात नाही. सराव नसतो पण येत नाही असं होत नाही. मी महसूल विभागापासून दूर असलो तरी तसा माझा सराव होत असे. महसूल खात्यातला असल्याने लोक सल्ला आणि शिफारशीसाठी येत राहायचे. त्यामुळे मला माझ्या कामाबद्दल यत्किंचितही शंका नव्हती.

पहिल्या दिवसापासून मी फार काही नवीन केलं नाही. फक्त माझ्या कार्यालयाची कवाडे सामान्यांसाठी खुली केली. इतकी की काहींना लोकांची जत्रा भरली आहे असे वाटावे. ‘अधिकारी भेटत नाही’ हा जनतेचाप्रामुख्याने रोष असतो. त्यामुळे अधिकाऱ्यानं भेटणं, त्यानं ऐकून घेणं , आस्थेवाईकपणे बोलणं हे सुद्धा जनतेला सुखद अनुभव देऊन जातं. ‘काम आज नाही तर उद्या होईल पण साहेब छान बोलले; लगेच तहसीलदार, तलाठ्यांना फोन केला!’ याचं देखील समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकतं. मी तर या जिल्ह्याच्या मातीत जन्म घेतला आहे. या मातीशी आणि माणसांशी बांधीलकी राखणं हे माझं कर्तव्य होतं. मी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा व ऐकून घेण्याचा प्रयत्न करत आलो आहे. सुनावण्या संपण्यासाठी रोज संध्याकाळचे पाच वाजतात. त्यानंतर सरासरी रात्री ७.३० वा पर्यंत मी कार्यालयात लोकांना भेटत राहिलो .आज वर यात सातत्य ठेवलं आहे. क्वचित प्रसंगी बैठका लागतात. दौरा करावा लागतो. त्यावेळी मात्र न भेटता लोक गेल्याचा चटका मनाला लागतो. संपुर्ण बारा महिन्यात एकदाच दुपारी घरी जाऊन विश्रांती घेतली. ( यलो फिवरची लस घेतल्यामुळे डॉक्टरने तसा सल्ला दिला होता.)

मी कामात डूंबलो आहे. एक वर्ष कसं झपाटयानं गेलं ते समजलं पण नाही. अगदी काल-परवा रूजू झाल्यासारखं वाटतं आहे. झोकून दिलं की वेळ कशी गेली हे कळत नाही. घरच्यांना वाटलं होतं की, मी आता तरी त्यांच्या वाटयाला येईल. पण मी पहिल्यापेक्षा अधिक बिझी झालोय, हे त्यांना दिसतं. सौ. ने निराशा लपवत ते स्विकारलं आहे. ‘माझं लोकार्पण झालंय !’असं तिला मी विनोदानं म्हणतो. जीव ओतून काम करण्यात मजा असते. पण त्यासाठी घरच्यांची साथ असायला हवी. ती मला मिळत असते.

छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्याची जहागिरी मिळाली तेव्हा त्यांनी जमीनींचे निवाडे देखील दिले होते. ते निवाडे देण्याचं भाग्य मला लाभलं. मागील वर्षात ह्या जबाबदारीची जाणीव सतत मनात तेवत ठेवली. कुणाचा छळ करणे तर रक्तात नाही परंतू अनावधानाने कुणाला झळ ही नको या साठी प्रयत्न करतो आहे. आव्हाने खूप आहेत. लोकांचे प्रश्न अगणित आहेत. भेटीवेळी सामान्यांचा व्यवस्थेवरील कमी चाललेला विश्वास, मावळत चाललेल्या आशा आणि भळभळणाऱ्या व्यथा चटकन दिसून येतात. अशा लोकांसाठी मी माझ्या परीने झटतो आहे. सामान्य माणसाच्या डोळ्यांत आशेचा किरण पाहणं व एखादं काम झालं की, कृतज्ञतेने त्याने जोडलेले हात हाती घेणे यात मी माझ्या वर्षेपुर्तीचं समाधान पाहतो आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण आनंदी आहे.

आपला ,
सतीश मंगला ज्ञानदेव राऊत

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *